शिवसेनेकडून संघाच्या बदलत्या भूमिकेचे स्वागत

0
243

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी संघाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परिवर्तन चांगलं आहे. पण संघ इतका का बदलतोय याचा विचार झाला पाहिजे, असं सांगतानाच संघाने स्वत:ला बदलायचं ठरवलं असेल तर त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहिलं पाहिजे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. परिवर्तन चांगलं आहे. संघ इतकी वर्ष आपण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडत आला. मतांसाठी आपण धार्मिक विभाजन आणि फाळणी करत आला. त्यात असंख्य हिंदू आणि मुस्लिमांचे बळी गेले. आता तर हे परिवर्तन होत असेल आणि त्यातून जर देशाच्या एकता आणि अखंडतेला बळ मिळत असेल तर संघ इतका का बदलतोय या संदर्भात विचार केला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

संघाचं कार्य चांगलं –
संघाचं कार्य विविध क्षेत्रात नक्कीच चांगलं आहे. त्यांच्या अनेक भूमिकांवर आम्ही चर्चा केल्या आहेत. त्यांच्या भूमिकाही स्वीकारल्या आहेत. ठिक आहे. संघानं जर स्वत:ला बदलायचं स्वीकारलं असेल तर त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

भागवतांनी काय केली घोषणा?
मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंतन शिबिराचा काल समारोप झाला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं. मुस्लिम मोहल्ल्यांमध्येही संघाच्या शाखा निर्माण करण्यात येणार असल्याचं मोहन भागवत यांनी जाहीर केलं. तसेच आयटी सेल स्थापन करण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं. त्यामुळे मुस्लिम वस्त्यांमध्येही आपला जम बसविण्याची संघाने तयारी सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली नाही. त्यामुळे आता बंगाल सर करण्यासाठी संघाने रणनीती आखली आहे. यावेळी संघाने पश्चिम बंगालला तीन खंडात विभाजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता दक्षिण बंगालचं मुख्यालय कोलकाता, मध्य बंगालचं मुख्यालय वर्धमान जिल्ह्यात तर उत्तर बंगालचं मुख्यालय सिलीगुडी येथे असेल. शिबीराच्या जबाबदाऱ्यांमध्येही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत.

संघ आयटी सेल स्थापन करणार – 
देशभरातील मुस्लिम वस्त्यांमध्ये संघाच्या शाखा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संघाशी मुस्लिमांना जोडण्यात येणार आहे. त्याशिवाय संघाने सोशल मीडियावरही अधिक सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय संघाने आयटी सेल उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आयआयटी पासआऊट तरुणांना या आयटी सेलमध्ये संधी देण्यात येणार आहे.