शिवसेना प्रवेशा आधीच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार सुरु

0
724

विरार, दि. २३ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र अधिकृत पक्षप्रवेशापूर्वीच शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे . नालासोपारा विधानासभा मतदारसंघातून प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

मुंबईत ठिकठकाणी आता दहीहंडी उत्सव, गणपती उत्सव यांची तयारी सध्या जोरात सुरु आहे. यानिमित्ताने नालासोपारा मतदारसंघातही शिवसेना कार्यकर्त्यांनीही या सर्व उत्सवांची धामधूम सुरु केली आहे . या ठिकाणी भावी आमदार प्रदीप शर्मा असे बॅनर लागले आहेत. तसेच शर्मा यांचे फोटो असलेल्या २० हजारांहून अधिक टीशर्ट्सचेही वाटप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोकणवासियांना गणपती दर्शनासाठी १०० रुपयात बसेस करुन देण्यात येत आहेत. त्यावरही प्रदीप शर्मा यांना सौजन्य देण्यात आले आहे. त्यामुळे शर्मांच्या पक्षप्रवेशापूर्वीच प्रचार यंत्रणा सज्ज झाली आहे.