शिर्डीत पंतप्रधान मोदींच्यासोबत इतर भाविकांनाही साईंचे दर्शन घेता येणार  

0
639

अहमदनगर, दि. १८ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.१९) साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्ताने शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान ज्यावेळी साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी येतील, त्यावेळी इतर भाविकांनाही दर्शन घेता येईले, अशी माहिती शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.  

मोदी शिर्डीत येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसामान्य भाविकांना प्रवेश नाकारण्यात येणार अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, पंतप्रधान कार्यलयातूनच भाविकांना त्रास होणार नाही, असे नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उत्सव काळात ५ ते ७ लाख भाविक साईबाबांचे दर्शन घेतील, असा अंदाज आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शताब्दी वर्षाचा  ध्वजावतरणाने समारोप होणार आहे. त्यानंतर दर्शनबारीसह विविध विकास कामांचे भूमीपूजन केले जाणार आहे. दरम्यान, कार्यक्रमासाठी शिर्डी संस्थानचे सुरक्षा रक्षक आणि पोलिस कर्मचारी असा ४ ते ५ हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.