पुणे विमानतळावर विदेशी महिलांकडून ६६ लाखांचे सोने जप्त

644

पुणे, दि. १८ (पीसीबी) –  चार परदेशी महिलांनी दुबईहून तस्करी करून आणलेले दोन किलो सोने सीमाशुल्क विभागाच्या पथकाने जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ६६ लाख ५० हजार ७७९ रूपये आहे. ही कारवाई बुधवारी (दि.१७) सकाळच्या सुमारास करण्यात आली होती.

खवला इलाहाडी अहमद अमारा, मावहिब मस्सी अहमद  एडम, सलमा सलाह मोहम्मद अहमद यासीन, मनाव एल्ताब अब्ददा मोहम्मद (सर्व रा. सुदान) अशी कस्टमकडून ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. या महिलांविरोधात भारतीय सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला दुबईहून बुधवारी सकाळी पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरल्या. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेतून घाईने निघालेल्या चौघींबाबत संशय आल्याने कस्टमच्या पथकाने त्यांची तपासणी सुरू केली. स्कॅनिंग यंत्राने दिलेल्या संदेशानंतर चौघींनी शरीरात सोने लपविल्याचे उघड झाले. त्यानंतर तातडीने चौघींना ससून रूग्णालयात नेण्यात आले. तपासणीत महिलांनी शरीरात सोन्याची दहा-दहा ग्रॅमची बिस्किटे लपविल्याचे उघड झाले. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी चौघींकडून दोन किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. यापूर्वीही त्या भारतात आल्याचे पारपत्रावरील नोंदीवरून आढळून आले आहे. ही कारवाई उपायुक्त के. आर. रामाराव, हर्षल मेटे यांच्या पथकाने केली.