शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांना आव्हान देण्यासाठी चंदन सोंडेकर इच्छुक; राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी

0
8681

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच निवडणुकीत रिंगणात असणार हे निश्चित आहे. परंतु, राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील, विलास लांडे, मंगलदास बांदल, प्रदीप कंद यांच्या नावांची चर्चा होत असली, तरी शिरूरमध्ये शिवसेनेचा पराभव करणे सोपे नसल्याने केवळ आपले नाव शर्यतीत राहावे एवढीच या सर्वांची इच्छा असल्याचे समजते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी आढळराव पाटलांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी पक्षाकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी मतदानाच्या ४५ दिवस आधी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक असणारे सर्वपक्षीय संभाव्य उमेदवार जोरदार कामाला लागले आहेत. पिंपरी-चिंचवडचा मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. यातील मावळ मतदारसंघातील सर्वपक्षीय इच्छुकांनी गाठीभेटीद्वारे फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. परंतु, शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील वगळता इतर पक्षातील इच्छुकांनी अजूनही “वेट अँड वॉच”ची भूमिका ठेवली आहे. विशेषतः राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये लढावे की न लढावे, असा संभ्रम पाहायला मिळत आहे. शिरूरमध्ये शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी अशीच प्रमुख लढत असताना राष्ट्रवादीच्या इच्छुकांमधील संभ्रम बरेच काही सांगणारा आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील, विलास लांडे, मंगलदास बांदल, प्रदीप कंद, देवदत्त निकम यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, यांच्यापैकी एकाचीही लढण्याची प्रबळ इच्छा दिसून येत नाही. कारण शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करणे एवढे सोपे नसल्याची जाणीव या सर्वांना आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींपुढे केवळ आपले नाव चर्चेत राहावे, एवढीच या सर्वांची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. तसे झाले तर विधानसभेला आपल्या नावाचा विचार होतो, असा या सर्वांचा कयास आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींपुढे शिरूरमध्ये उमेदवार कोण द्यायचा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी शिवसेनेला मी देतो आव्हान, असे पक्षश्रेष्ठींपुढे ठणकावून सांगितले आहे.

शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीने मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी सोंडेकर यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सोंडेकर यांनी पुणे शहर व जिल्ह्यात पक्षाचे काम केले आहे. अनेक निवडणुकांचे प्रचारप्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे. शहरी आणि ग्रामीण राजकारणाची ओळख असलेल्या सोंडेकर यांनी लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिरूर मतदारसंघातील पक्षाचे दिग्गज उमेदवार लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार होत नसताना सोंडेकर यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना आव्हान देण्याची हिंमत दाखवली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीचेच नेते पराभव करतात हा इतिहास आहे. अशा परिस्थितीत सर्वांशी जुळवून घेणारा उमेदवार दिला तरच राष्ट्रवादीचा विजय दृष्टिपथात येऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी सोंडेकर यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराचा विचार करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.