शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी सेवाभावी संस्थांनीही पुढाकार घ्यावा – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे आवाहन

0
396

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्या प्रवृत्तीवर घाव घालणे गरजेचे आहे. गुन्हेगारीची प्रवृत्ती संपली तर गुन्हेगारी आपोआप संपेल. यासाठी कनेक्टिंग एनजीओच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील सामाजिक संस्थांना पुढे येण्याचे आवाहन केले. त्याला सामाजिक संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी एक आराखडा तयार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

शुक्रवारी (दि. 23) पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील सामाजिक संस्था, संघटना, कार्पोरेट अधिकारी
यांच्यासोबत वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधला. या वेबिनारसाठी 100 जण उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) च्या माध्यमातून या वेबिनारचे आयोजन करण्यात
आले होते.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना विविध उपक्रमांची माहिती दिली.
नागरिकांचे सहकार्य गरजेचे खूप महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. पोलीस काका, पोलीस दीदी, बडी कॉप आणि पोलिसांच्या विविध उपक्रमातील पोलीस आणि डॉक्टर, समुपदेशक, समाजसेवक, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक यांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणले जाणार आहे. त्यातून नवीन संकल्पनांना बळ दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘व्हिलेज डिफेन्स पार्टी’ ही संकल्पना मुंबई पोलिसांच्या मॅन्युअलमध्ये आहे. ती पिंपरी चिंचवड
शहरात राबवण्यासाठी सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. रात्री 12 ते
पहाटे 5 या वेळेत दररोज एका पथकाने आपापल्या परिसरात गस्त घालायची. दररोज वेगळे पथक
गस्त घालेल. एक पथक आठवड्यातून एकच दिवस गस्त घालेल, अशी ही संकल्पना आहे.
जपान देशात ही संकल्पान खूप यशस्वी झाली. ही संकल्पना राबविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी
सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यासाठी सामाजिक संस्थांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

शहरातील विविध वस्त्यांमधून बाल गुन्हेगार कसे तयार होतात त्याचे दाखले त्यांनी दिले. आई-वडिल
कामासाठी दिवसभर बाहेर जातात. त्यामुळे या मुलांकडे त्यांचे लक्ष नसते, ती नंतर गुन्हेगारीकडे वळतात.
त्यामुळे समाजाचे वातावरण खराब होते. त्यासाठी या मुलांवर संस्कार होणे गरजेचे आहे. मोकाट फिरणाऱ्या
या मुलांना स्कील जॉब मिळवेत यासाठी त्यांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीकडे आकर्षित होण्याचे प्रमाण त्यातून कमी होऊ शकते. त्यांना वेळीच मार्गदर्शन करून योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे. क्रेडाई सारख्या संस्था त्यासाठी पुढाकार घ्यायला तयार आहेत.

सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून अन्य संस्था, संघटनांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती संपविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. अशा मुलांना मार्गदर्शन, रोजगाराची उपलब्धता वाढवून प्रशिक्षण देऊन मानसिक परिवर्तन करायला हवे, असे मत आयुक्तांनी मांडले. त्यासाठी देखील सामाजिक संस्था आणि कार्पोरेट कंपन्या पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन या वेबिनारमध्ये देण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत भावसर यांनी केले तर पीसीबी टुडे चे संपादक अविनाश
चिलेकर यांनी आयुक्तांचा परिचय करून दिला. जेष्ठ नागरिक महासंघाचे सूर्यकांत मुथीयान यांनी उपस्थितांचे आभार मानले