पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समितीच्या सभापतींची निवड बिनविरोध

0
336

पिंपरी,दि.२३(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृहात त्या त्या समितीची विशेष सभा घेण्यात आली. पुणे विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद यांनी या सभांचे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी समिती सभापती पदी- स्विनल कपिल म्हेत्रे, महीला व बाल कल्याण समिती सभापती पदी-चंदा राजु लेखंडे, शहरसुधारना समिती सभापतीपदी -सोनाली दत्तात्रय गव्हाणे, कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक समिती सभापतीपदी-उत्तम प्रकाश केंदळे, शिक्षण समिती सभापतीपदी – मनिषा प्रमोद पवार यांची बिनविरोध निवड करण्यीत आली.

निवडणूकीच्या वेळी अतिरिक्त आयुक्त अजित पवार, उपायुक्त अजय चारठणकर, संदीप खोत, मनोज लोणकर, चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आयुक्त सुनिल अलमलेकर, अण्णा बोदडे, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे उपस्थित होते.

दरम्यान नगरसचिव उल्हास जगताप यांनी सर्व सभांचे कामकाज पाहिले. नवनिर्वाचित विषय समिती सभापतींचे महापौर उषा उर्फ माई ढोरे तसेच सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी अभिनंदन केले.