शहराची लोकसंख्या 25 लाख अन् वाहने साडेअठरा लाख

0
350

पिंपरी दि. १३ (पीसीबी) – औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत आहे. आशिया खंडातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या शहरामध्ये पिंपरी-चिंचवडचा वरचा क्रमांक आहे. असे असताना शहरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्यांही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्यस्थितीत शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या घरात गेली आहे. तर, वाहनांची संख्या साडेअठरा लाखांच्या पुढे गेली आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे शहरातील प्रदूषणही वाढत असून ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची कामगारनगरी, औद्योगिक नगरी ते बेस्ट, स्मार्ट, मेट्रोसिटी अशी ओळख निर्माण होत आहे. शहर आणि परिसरात भोसरी, चाकण, रांजणगाव, तळेगाव दाभाडे एमआयडीसी, हिंजवडी, तळवडे आयटी पार्क आहे. यामध्ये लाखो उच्चशिक्षितांपासून अशिक्षितांच्या हाताला रोजगार मिळत आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक शिक्षण, व्यवसाय, नोकरीनिमित्त येत आहेत. त्यामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मूलभूत सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने अनेक जण स्वतःची वाहने वापरण्यास पसंती देत आहे. पर्यायाने शहरातील वाहनांची संख्या वाढत असून रस्ते अपुरे पडत आहेत.

शहरातील रस्त्यांवर असलेली खासगी वाहने वायू प्रदूषणावर परिणाम करत आहेत. खासगी वाहनांची संख्या जितकी जास्त तितकी रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, वाहनांमधून होणारे उत्सर्जन जास्त हे ठरलेले आहे. यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. शहरातील वाहनांच्या वाढत्या वापरामुळे हवेतील सल्फर डाय ऑक्‍साईडचे प्रमाण वाढले असल्याचे महापालिकेच्या पर्यायावरण अहवालात नमूद करण्यात आले आहे. शहराच्या विविध परिसरातील वायूप्रदूषण तपासणी करण्यात आली आहे. शहर परिसरात सल्फर डाय ऑक्‍साईड, नायट्रोजन, धुलीकण, कार्बन मोनॉक्‍साईड हवेतील प्रमाण हे प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्‍चित केलेल्या विहित मर्यादेमध्ये आहे. मात्र, पावसाळ्यात ती पातळी तुलनेने कमी झाल्याचे दिसून येते. शहराच्या विविध भागांमध्ये ध्वनी पातळी ही प्रदूषण मंडळाच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे.

शहरात तीन वर्षांत साडेतीन लाख वाहनांची संख्या वाढली आहे. तर 2020-21च्या तुलनेत 2021-22 मध्ये वाहनांच्या नोंदणी संख्येमध्ये वाढ झाली आहे. शहरात सध्यस्थितीत 18 लाख 68 हजार 463 वाहनांची नोंद आहे. यामध्ये 12 लाख 96 हजार 187 दुचाकी, 3 हजार 479 तीनचाकी, 27 हजार 722 ऑटो रिक्षा, 3 लाख 83 हजार 573 कार, 13 हजार 343 बस, 92 हजार 348 ट्रक तर 51 हजार 811 इतर वाहने आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील दुचाकी वाहनांची संख्या दरवर्षी हजारोंच्या घरात वाढत आहे. 2019 मध्ये या एकाच वर्षांत तब्बल 1 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी दुचाकी वाहने खरेदी केल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे शहरात आतापर्यंत 12 लाख 96 हजार 187 दुचाकी वाहनांची नोंद असल्याचे समोर आले आहे.