श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा भोसरीतील समस्त गव्हाणे तालीम मंडळाला प्रथम पुरस्कार

0
722

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात आली नाही. 2019 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून भोसरीतील समस्त गव्हाणे तालीम मंडळाला 51 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाल्याची माहिती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत दिली. ट्रस्टमार्फत 2019 मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील 129 मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यामधून 109 गणेश मंडळे बक्षीसासाठी पात्र ठरली आहेत. या मंडळांना 13 लाख 1 हजार रुपयांच्या रोख बक्षिसांचे वाटप केले जाणार.

निगडीत झालेल्या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासणे, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, सरचिटणीस माणिक चव्हाण, विश्वस्त अमोल केदारी, समन्वयक अनिल वाघेरे राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते. बक्षिस वितरणाचा कार्यक्रम येत्या गुरुवारी (दि.18) पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात सायंकाळी सहा वाजता होणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे. चिंचवड स्टेशन येथील यशस्वी मित्र मंडळ द्वितीय, जाधववाडी-चिखलीतील सुभाष मित्र मंडळ तृतीय, आकुर्डी गावठाणातील नागेश्वर मित्र मंडळ चतृर्थ आणि चिंचवडगावातील अखिल मंडई मित्र मंडळाने पाचवा क्रमांक पटकाविला आहे. या मंडळांना रोख रक्कम आणि चषक देण्यात येणार आहे.

सातत्याने पहिल्या पाच क्रमांकांमध्ये येणा-या सात मंडळांना ‘जय गणेश भूषण पुरस्कार’ आणि 10 हजार रुपयांचे बक्षीस देऊन स्पर्धेतून निवृत्त केले जाणार आहे. त्यामध्ये भोसरी लांडगे आळीतील पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ, निगडी गावठाणातील जय बजरंग तरुण मंडळ, निगडी, प्राधिकरणातील जय हिंद मित्र मंडळ, चिंचवड येथील एस के एफ मित्र मंडळ, गांधीपेठ तालीम मित्र मंडळ, काळभोरनगर येथील राष्ट्रतेज तरुण मंडळ आणि भोसरीतील लांडगे लिंबाची तालीम मित्र मंडळ या मंडळांचा समावेश आहे.

प्रभागनिहाय स्पर्धेत ‘अ’ प्रभागात आकुर्डी गावठाणातील भैरवनाथ मित्र मंडळाचा प्रथम क्रमांक आला आहे. तर, आकुर्डी, विठ्ठलवाडीतील श्रीकृष्ण क्रांती मंडळ, रुपीनगर मधील दक्षता तरुण मंडळ, एकता मित्र मंडळ, चिंचवड रामनगर येथील परशुराम मित्र मंडळांना अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळाला आहे. ‘ब’ प्रभागात चिंचवडगावातील नवतरुण मित्र मंडळ, चिंतामणी मित्र मंडळ, श्री लक्ष्मीनगर सार्वजनिक मित्र मंडळ, उत्कृष्ट तरुण मंडळ आणि मोरया मित्र मंडळ ट्रस्ट यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक आला आहे.

‘क’ प्रभागात भोसरीतील श्रीराम मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळ यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक आला आहे. तर, ‘ड’ प्रभागात पिंपरीतील अमरदीप तरुण मंडळ, थेरगावातील सम्राट मित्र मंडळ, पिंपरीतील शिवराजे प्रतिष्ठान, जुनी सांगवीतील आनंदनगर मित्र मंडळ आणि वाकड येथील उत्कर्ष मित्र मंडळाचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक आला आहे. प्रथम क्रमांकाला 25 हजार, द्वितीय 22 हजार 500, तृतीय 20 हजार, चतृर्थ 17 हजार 500, पाचव्या क्रमांला 15 हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे.

जिवंत देखावे सादर करणा-या 15 मंडळांना 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यात पिंपरी, संत तुकारामनगर येथील सिद्धिविनायक प्रतिष्ठान, चिखलीतील वीर अभिमन्यून फ्रेंड सर्कल, श्री हनुमान व्यायाम मंडळ, श्री शिवछत्रपती मित्र मंडळ, पिंपळेगुरव येथील अनंतनगर तरुण मित्र मंडळ, खंडोबा माळ मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, थेरगावातील जय महाराष्ट्र मित्र मंडळ, रुपीनगर येथील क्रांती ज्योत मित्र मंडळ, काळेवाडीतील ज्योतिबा कामगार कल्याण मित्र मंडळ, थेरगावातील आनंद पार्क मित्र मंडळ, क्रांतिवीर मित्र मंडळ, दिघीरोडचे नरवीर तानाजी तरुण मंडळ, रहाटणीतील सेवन स्टार स्पोटर्स क्लब आणि चिंचवड, रामनगर येथील त्रिमूर्ती मित्र मंडळाचा समावेश आहे.

उत्कृष्ट स्थिर देखाव्याचे 5 मंडळांना 15 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यात मोशीतील शिवशंभो प्रतिष्ठान, भोसरीतील नवज्योत गणेश मित्र मंडळ, कै. भगवान गव्हाणे तरुण मित्र मंडळ, नव महाराष्ट्र तरुण मंडळ आणि पिंपरी अजमेरा कॉलनीतील एकता मित्र मंडळाला बक्षीस देण्यात येणार आहे.