शरद पवार भाजपा आघाडीमध्ये आले तर, उपपंतप्रधान पद मिळू शकते- आठवले

0
876

वर्धा, दि. ३ (पीसीबी) – पंतप्रधानपदासाठी विरोधकांकडे अनेक उमेदवार आहेत तर भाजपाकडे एकच मोदी आहेत. राहुल गांधींना शरद पवार पाठिंबा देणार नाही तर शरद पवारांना राहुल गांधी पाठिंबा देणार नाही . पण जर का शरद पवार भाजपा आघाडीमध्ये आले तर पवार यांना उपपंतप्रधान पद मिळू शकते असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. वर्धा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

भाजपा सरकारमुळे संविधान धोक्यात येत असल्याचा गवगवा विरोधी पक्ष करीत आहे, पण संविधान वाचवण्यापेक्षा काँग्रेसने स्वत:चा पक्ष वाचवावा. संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व आम्ही सक्षम आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

संविधान जाळल्याने ते धोक्यात येण्याइतके कमजोर नाही, अशी टिपणी त्यांनी केली. दलित हा शब्द अपमानकारक नाही. जो आर्थिक व सामाजिक मागासलेला आहे, तो दलित होय. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या कामगिरीवर जनता खूष असल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले, देशात एकमेकांविरुद्ध लढण्याचे वातावरण तयार केले जात आहे. एकटय़ा मोदींविरुद्ध सर्व एकत्र येत आहे. मात्र त्याचा आम्हाला आनंदच आहे. त्यांना ते ६० वर्षांत जमले नाही ते मोदी सरकारने पाच वर्षांत करण्याचा प्रयत्न केला. भाजप, सेना व आरपीआय सरकारच्या काळात दलितांसाठी विविध योजना राबवण्यात आल्या. इंदू मिलची जागा ताब्यात आली असून ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’पेक्षाही मोठे स्मारक ६ डिसेंबर २०२० पूर्वी पूर्ण होणार आहे. त्यामुळे २०१९ मध्येही मोदीच परत पंतप्रधान होतील, असे आठवले म्हणाले.

दलितांना आरक्षण मिळत असल्याने त्यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद करीत ते म्हणाले की, आर्थिक परिस्थितीत कमकुवत असलेल्यांसाठी २५ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. उच्चवर्णीयांना आरक्षण देऊन त्यांची उत्पन्न मर्यादा आठ लाखापर्यंत करावी. आरक्षणासाठी वारंवार होणाऱ्या आंदोलनांना तोंड देण्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी कायदा व्हावा म्हणून मी प्रयत्नशील आहे. राम मंदिराबाबत भाष्य करताना ते म्हणाले की, त्या जागेवर प्रथम बौद्धांचा अधिकार होता. कालांतराने हिंदू व नंतर मुस्लिमांचा ताबा झाला. सध्या असलेल्या वादावर न्यायालयाच्या निर्णयानुसारच पुढील धोरण ठरवावे.