वेगवान गोलंदाजांच्या प्रयत्नांमुळे न्यूझीलंडचा पहिल्या कसोटीत विजय

0
181

माऊंट मौनगनुई,दि.३०(पीसीबी) – पाकिस्तानच्या मधल्या फळीच्या प्रतिकारानंतरही वेगवान गोलंदाजांच्या प्रयत्नांमुळे न्यूझीलंडला पहिल्या कसोटीत विजय मिळविता आला. न्यूझीलंडने १०१ धावांनी हा सामना जिंकताना, पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत खेळण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या.

विजयासाठी ३७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था ३ बाद ७४ अशी होती. आज अखेरच्या सत्रापर्यंत त्यांनी तग धरला होता. पण, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नेटाने मारा करताना ४.३ षटके शिल्लक असताना पाकिस्तानच्या डावाला २७१ धावांवर पूर्णविराम देत ताणल्या गेलेल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानने चौथ्या दिवस अखेरच्या ४ बाद ७४ धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरवात केल्यावर त्यांना सुरवातीलाच धक्का बसला. कालचा नाबाद फलंदाज अझर अली वैयक्तिक धावसंख्येत एका धावेची भर घालून बाद झाला. पण, त्यानंतर फवाद आलम आणि महंमद रिझवान यांनी नेटाने फलंदाजी केली. या जोडीच्या १६५ धावांच्या भागीदारीने पाकिस्तानला विजय नाही, पण सामना वाचविण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. फवाद आलमने शानदार शतक साजरे केले. रिझवाननेही त्याला सुरेख साथ केली. आधी लंच, नंतर टी टाईम आणि नंतर अखेरचे सत्र पाकिस्तानची जोडी काही केल्या आऊट होत नव्हती.

अखेरच्या सत्रात अखेर न्यूझीलंडला ब्रेक थ्रू मिळाला. काईल जेमिसन याने रिझवानला पायचित करून ही जोडी फोडली. त्याने ६० धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा पाकिस्तानला २५ षटकांत १३१ धावांची आवश्यकता होती. जेमिसनने नंतर यासिर शाहला शून्यावर परतवले. दुखऱ्या टाचेच्या वेदना विसरून गोलंदाजी करणाऱ्या नील वॅगनरने शतकवीर फवादचा अडसर दूर केला. त्याने १०२ धावांची खेळी केली. पाठोपाठ त्याने फहीम अश्रफलाही बाद केले. शेवटी मिशेल सॅंटनेरच्या फिरकीने अखेरचे दोन गडी टिपले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडच्या बोल्ट, साऊदी, वॅगनर, जेमिसन आणि सॅटनेर या पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून सुरू होईल. आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी सामन्यात खेळायचे असेल, तर त्यांना ही कसोटी जिंकावीच लागेल.