विरोधक मनसेलाच काय, तर डोनाल्ड ट्रम्पना सोबत घेतील; संजय राऊतांचा टोला

0
526

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – राज्यातील विरोधी पक्ष केवळ कागदावर उरलेला आहे. त्यामुळे  विरोधक मनसेलाच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही सोबत घेतील,  असा खोचक टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेनेच्या पीकविमा मोर्चावर टीका करणाऱ्या विरोधकांचा  राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. राऊत म्हणाले की, राज्यातील विरोधी पक्षावर जनतेचा विश्‍वास राहिलेला नाही. विरोधी पक्ष कुचकामी बनले आहेत. त्यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा मोर्चा का काढला नाही? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तसेच आजवर शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाविषय लढत आली आहे. या पुढे देखील लढत राहील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेस आघाडीत मनसे सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी विरोधक मनसेलाच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही सोबत घेतील, असा टोला लगावला.