विमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९  वर्षांचा तुरुंगवास

0
1190

अमेरिका, दि. १४ (पीसीबी) – विमान प्रवासात झोपलेल्या महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका भारतीय व्यक्तीला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा  अमेरिकेच्या स्थानिक कोर्टाने ठोठावली आहे.

प्रभू राममूर्ती (वय ३५) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पिरीट एअरलाइन्स या विमानात प्रभूची पत्नी आणि पीडित महिला या दोघी बाजूच्या सीटवर तर प्रभू हा मधल्या सीटवर बसला होता. लास वेगासपासून या विमानाने उड्डाण केले होते. याच वर्षी जानेवारी महिन्यांत ही घटना घडली होती. या प्रकरणी २३ वर्षीय पीडित मॉडेल तरुणीने आरोप केला की, आपण झोपेत असताना प्रभूने आपल्या पॅन्टची चैन आणि शर्टचे बटण खोलले होते तसेच त्याने आपला विनयभंगही केला होता.

या गंभीर लैंगिक छळाच्या गुन्ह्याबद्दल आरोपीला ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या वकिलांनी कोर्टाकडे केली होती. मात्र, गुन्हा सिद्ध झाल्याने कोर्टाने त्याला ९ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. ऑगस्ट २०१८मध्ये प्रभूवर हे आरोप सिद्ध झाले होते. या गुन्ह्यात ९ वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर त्याला भारतात पाठवून देण्यात येणार आहे.