विद्यार्थ्यांसमोर जया प्रदांची ‘शाळा’ झाली, इंग्रजीत ‘भारत माझा देश आहे’ लिहिताना चूक केली

0
688

मुंबई, दि ७ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजापमध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री आणि भाजपा नेता जया प्रदा यांची शाळेतील विद्यार्थांसमोर चांगलीच फजिती झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना जया प्रदा यांनी स्वतःच चुकीची स्पेलिंग लिहिल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. जया प्रदा यांनी भाजपाच्या तिकीटावर उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या आझम खान यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

 

स्कूल चलो अभियानाअंतर्गत जया प्रदा या हजरतनगर सैदपुर येथील एका शाळेत पोहोचल्या होत्या. सर्वप्रथम विद्यार्थ्यांची हिंदीत शिकवणी त्यांनी घेतली त्यानंतर तुम्हाला इंग्रजी येतं ना? असा प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला, त्यावर मुलांनी होय असं उत्तर दिलं. त्यानंतर जया प्रदा यांनी फळ्यावर काही फळांची नावं इंग्रजीत लिहिली, आणि अखेरीस त्यांनीभारत माझा देश आहेहे वाक्य इंग्रजीत लिहिलं. पण, या वाक्याची इंग्रजीतील अचूक स्पेलिंग “India is my country” अशी असताना जया प्रदा यांनी country ची स्पेलिंग चुकवली आणि त्याऐवजी contry असं लिहिलं. त्यावेळी काही शिक्षिका देखील उपस्थित होत्या पण कोणीही हस्तक्षेप केला नाही. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

 

दरम्यान, काही वेळानंतर चूक दुरूस्त करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना अचूक स्पेलिंग शिकवण्यात आल्याचं स्पष्टीकरण प्राथमिक शिक्षण अधिकारी ऐश्वर्या लक्ष्मी यांनी एबीपी न्यूजशी बोलताना दिलं. जया प्रदा यांनी चुकीची स्पेलिंग लिहिली त्याचवेळी लक्षात आलं होतं, पण त्यावेळी त्यांना विद्यार्थ्यांनी गराडा घातल्यामुळे सांगितलं नाही. त्या निघून गेल्यावर त्यांची चूक दुरूस्त करण्यात आली असं ऐश्वर्या लक्ष्मी म्हणाल्या. पण जया प्रदा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांच्यावर टीका होत आहे.