विकाऊ लोकांच्या सांगण्यावरून दत्ता साने यांची पोपटपंची; धनगर समाजाची माफी मागा, विविध संघटनांची मागणी

0
856

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत कला, क्रीडा, सांस्कृतिक धोरणांतर्गत अनेक महापुरूषांच्या जयंत्या व पुण्यतिथीचे कार्यक्रम साजरे केले जातात. त्यानुसार मोरवाडी चौकात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ त्यांची दरवर्षी जयंती साजरी केली जात आहे. परंतु, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आहिल्यादेवी यांच्या जयंतीवर महापालिकेकडून होणाऱ्या खर्चाबाबत शंका उपस्थित करून जयंती कार्यक्रमाला एकप्रकारे विरोधच केला आहे. त्यामुळे दत्ता साने यांचा सकल धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. साने यांनी ज्या संस्थेवर आरोप केले आहेत, त्या संस्थेची धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी झालेली आहे जयंती कार्यक्रमांसाठी महापालिकेने संबंधित संस्थेला एक रुपया तरी दिल्याचे पुरावे दत्ता साने यांनी द्यावेत. अन्यथा विकाऊ लोकांच्या सांगण्यावरून आरोप करणाऱ्या साने यांनी शहरातील धनगर बांधवांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी धनगर समाजाच्या विविध संघटनांनी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाने केली आहे.

यासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भरत महानवर, आहिल्यादेवी उत्सव कमिटी पिंपरीचे अध्यक्ष तुकाराम पाटील, ऑल इंडिया धनगर समाज या संघटनेचे अध्यक्ष दिपक भोजने, रुपीनगर येथील आहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन वाघमोडे, सांगवी येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष दादासाहेब चितळकर, थेरगाव येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश पाडुळे यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, “महापालिका अनेक महापुरूषांच्या जयंत्या व पुण्यातिथी साजरी करून महापुरूषांचा वारसा जतन करण्याचे काम करत आहे. त्यातून महापुरूषांनी केलेली महान कार्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहेत. आहिल्यादेवी होळकर या मराठा साम्राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठे कार्य निर्माण केलेल्या व्यक्ती आहेत. त्यामुळेच त्यांना पुण्यश्लोक उपाधीने संबोधले जाते. त्या होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे महापालिकेमार्फत आहिल्यादेवींची जयंती साजरी व्हावी, अशी पिंपरी-चिंचवडमधील तमाम धनगर बांधवांची मागणी होती. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर महापालिका प्रशासनाने पाच वर्षापूर्वी जयंती कार्यक्रम राबवण्यास सुरूवात केली.

गेल्या पाच वर्षांपासून मोरवाडी चौकातील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ महापालिकेमार्फत विविध कार्यक्रम राबवून त्यांची जयंती साजरी केली जात आहे. त्याद्वारे आहिल्यादेवींचे महान कार्य पुढच्या पिढीला सांगण्याचे काम महापालिकेकडून होत आहे. असे असताना विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवर महापालिकेकडून होणाऱ्या खर्चाबाबत विकाऊ लोकांच्या सांगण्यावरून विनाकारण शंका उपस्थित करून जयंती कार्यक्रमाला एकप्रकारे विरोधच केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सकल धनगर समाजाच्या वतीने दत्ता साने यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.

महापालिका आहिल्यादेवींचा जयंती कार्यक्रम एका खासगी मंडळामार्फत नव्हे, तर शहरातील सर्व धनगर बांधवांशी चर्चा करून घेत असतो. कार्यक्रम घेण्यासाठी महापालिकेला धनगर समाजाच्या एखाद्या मंडळाने मदत केली तर त्याबाबत दत्ता साने यांना वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. जे मंडळ महापालिकेला मदत करते त्याची धर्मादाय संस्थेकडे नोंदणी आहे. त्यामुळे दत्ता साने यांनी अर्धवट माहितीच्या आधारे विकाऊ लोकांच्या सांगण्यावरून एखाद्या मंडळाला टार्गेट करण्याच्या हेतूने आहिल्यादेवींच्या जयंती कार्यक्रमांना विरोध करून धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आहिल्यादेवींच्या जयंती कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी महापालिकेने कोणत्याही संस्थेला किंवा मंडळाला एक रुपया जरी दिला असेल, तर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी त्याचे पुरावे द्यावेत.

महापालिकेमार्फत साजरा केल्या जाणाऱ्या आहिल्यादेवी यांच्या जयंती कार्यक्रमांवर महापालिकेसोबतच धनगर बांधवांच्या अनेक संस्था व मंडळे स्वतःचा खर्च करतात. जयंती दिवशी या संस्था व मंडळे समाजबांधवांना एकत्र करण्याचे काम करतात. आहिल्यादेवी आमच्या श्रद्धास्थान आहेत. सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी विकाऊ लोकांच्या सांगण्यावरून स्वतःला राजकीय फायदा व्हावा म्हणून आमच्या श्रद्धास्थानाचा कोणाकडून वापर करण्याचा प्रयत्न होत असेल, तर धनगर बांधव ते कदापि खपवून घेणार नाही. त्यामुळे याप्रकरणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शहरातील धनगर बांधवांची जाहीर माफी मागावी.”