कंपनीचे गोदाम फोडणारी टोळी जेरबंद; ८६ कुलरसह दहा लाखांचा ऐवज जप्त

0
396

वाकड, दि. २१ (पीसीबी) – संभाजीनगर आणि पुणे येथे वेगवेगळ्या कंपन्यांचे गोदाम फोडून चोरी करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून ८६ कुलर आणि टेम्पो असा दहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

योगेश बाबाजी पुतमाळी (वय २३, रा. माळीवाडी, संभाजीनगर), अजीज बादशाह सय्यद (वय ४८, रा. भारतनगर, वाळुजगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर), ज्ञानेश्वर रामराव पल्हाळ (वय २३, रा. पवननगर, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

७ मे रोजी डीजीवन स्नेहांजली रिटेल या कंपनीचे रघुनंदन मंगल कार्यालयामागे ताथवडे येथे असलेले गोदाम चोरट्यांनी फोडले. गोदामातून ९० कुलर आणि एक किचन स्वयंपाक एक्झॉस्ट चिमणी चोरून नेली. वाकड पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस नाईक विक्रम कुदळ व प्रमोद कदम यांना या गोदामातील चोरी संभाजीनगर येथे राहणाNया चोरट्यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी संभाजीनगर येथून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून ८६ सिम्फनी कंपनीचे कुलर आणि एक टेबल कंपनीची किचन स्वयंपाक एक्झॉस्ट चिमणी आणि चोरी करण्यासाठी वापरलेला टेम्पो असा १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेले आरोपी सराईत असून त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.