वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र् मोदी यांच्याविरोधात काँग्रेसकडून कोण?

0
428

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी आव्हान देणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे. ‘प्रियांका गांधी या मोदींविरुद्ध लढतील की नाही याचा अंदाज तुम्हीच लावा. तुमचे अंदाज नेहमीच चुकत नसतात’, असे राहुल गांधी यांनी ‘द हिंदू’ वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. प्रियांका लढणार की नाही, याचे तुम्ही खंडन करीत नाहीत, असे विचारले असता, ‘या प्रश्नाला आपण दुजोरा देत नाही किंवा त्याचे खंडनही करीत नाही’, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध प्रियांका वाराणसीतून लढणार असल्याची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे. पक्ष जे सांगेल ती जबाबदारी स्वीकारण्याची आपली तयारी असल्याचे जाहीर करताना प्रियांका गांधी यांनीही वाराणसीतून लढायचे की नाही, याविषयी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मत मागवले होते. प्रियांका यांनी आई सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे काँग्रेसजनांनी सुचविले होते. पण ‘निवडणूकच लढवायची असेल तर वाराणसी का नको’, असा सवाल प्रियांका यांनी केला होता. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी होणाऱ्या वाराणसीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल आहे. वाराणसीतून प्रियांकांच्या लढण्याचा निर्णय अधांतरी ठेवून राहुल गांधी यांनी आपला प्रतिस्पर्धी कोण असेल, याविषयीची पंतप्रधान मोदी यांची उत्कंठा कायम ठेवली आहे.

धक्कातंत्राचा अवलंब

काँग्रेसने यापूर्वी बड्या नेत्यांच्या विरोधात तेवढ्याच तगड्या उमेदवाराला अनपेक्षितपणे उमेदवारी देण्याच्या धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरुद्ध स्व. माधवराव शिंदे, तर हेमवतीनंदन बहुगुणा यांच्याविरुद्ध अमिताभ बच्चन यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने त्यांना खिंडीत गाठले होते. उत्तर मुंबईत अभिनेता गोविंदा यांना उमेदवारी देत काँग्रेसने उत्तर प्रदेशचे विद्यमान राज्यपाल राम नाईक यांचाही पराभव घडवून आणला होता.