वाकडमध्ये कारचे लाईट लावून मृतदेहावर अंत्यसंस्कार

0
538

वाकड, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात कारचे लाईट लावून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. अंत्यसंस्काराच्या वेळीच स्मशानभूमीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने ही वेळ नातेवाईकांवर आल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरीतला उच्चभ्रू परिसर असलेल्या वाकडमध्ये हा प्रकार घडला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी रस्ता खणून ठेवल्याने चिखल झाल्याने अशा परिस्थितीतून अंत्यविधीसाठी नातेवाईकांना स्मशान गाठावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहर हे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. मात्र, काही घटनांमुळे शहरात खरी परिस्थिती काय आहे हे लक्षात आणून दिले आहे. ‘आयटी हब’ अशी ओळख हिंजवडीसह वाकड परिसराची आहे. तिथे अनेक उच्चशिक्षित तरुण राहतात.  याच परिसरात स्मशानभूमीतील वीज पुरवठा खंडित झाल्याने चक्क चारचाकी वाहनांच्या लाईटवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. वीज नसल्याने परिसरात काळोख पसरला होता. त्यामुळे स्मार्ट हा शब्द पिंपरी-चिंचवड शहराला शोभतो का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

वाकड येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला असून याचा त्रास अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना होतो आहे. त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्याने अडचणीत आणखी भर पडत आहे.