पेरणे येथे मोबाईल गेमच्या नादात तरुणाने केली आत्महत्या

0
450

पेरणे, दि. २१ (पीसीबी) – मोबाईल गेमच्या नादात एका महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.१९) पेरणेफाटा येथे घडली.

दिवाकर ऊर्फ संतोष धनपाल माळी (वय १९), असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाकरचे कुटुंबीय नोकरीनिमित्त पेरणेफाटा येथे स्थायिक झाले होते. तो वाघोली येथील महाविद्यालयात कॉमर्स पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून तो रात्र-रात्रभर मोबाईलवर गेम खेळत होता. गेल्या दोन दिवसांपासून तो कॉलेजलाही गेलेला नव्हता. शुक्रवारी त्याने अचानक त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे सर्वाना धक्का बसला आहे.

त्याने नेमक्या कोणत्या गेमच्या आहारी गेल्यामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत. लोणीकंद पोलिसांनी दिवाकरचा मोबाईल ताब्यात घेतला असून त्यात त्यांना काही अनाकलनीय कोडवर्ड्स आढळले आहेत. शिवाय घरात सापडलेल्या एका चिट्ठीत “आवर सन विल शाईन अगेन’, “पिंजऱ्यातील ब्लॅक पँथर फ्री झाला, आता कसल्याही बंधनात राहिला नाही,’ “द एंड’ असा मजकूर लिहिलेला आढळला. शिवाय त्याच्या व्हॉट्‌सअप आणि फेसबुक डिपीलाही मोबाईल गेममधील ‘ब्लॅक पँथर’ या कॅरेक्‍टरचा फोटो होता.