‘वर्षात 2021 मध्ये भारत यशाच्या नव्या शिखरावर असेल’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
369

नवी दिल्ली, दि.२७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 27 डिसेंबर रोजी त्यांनी या वर्षातील शेवटच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह त्यांनी नवीन वर्षात 2021 मध्ये भारत यशाच्या नव्या शिखरावर असेल आणि जगात भारताची ओळख आणखी मजबूत राष्ट्र म्हणून होईल, अशी कामना आपण करुयात असा संदेश दिला. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या अंजली आणि मुंबईच्या अभिषेक यांनी पाठवलेल्या संदेशाचं वाचन करत त्यांचं कौतुक केलं. 2020 या वर्षानं आपल्याला खूप काही दाखवलं आहे तसंच शिकवलं आहे, असंही मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, माझ्यासमोर तुमची असंख्य पत्रे आहेत. आपण mygovindia वर पाठविलेल्या सूचनासुद्धा माझ्यासमोर आहेत. अंजली यांनी कोल्हापूरहून लिहिले आहे की, आपण नेहमीच एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो, पण यावेळी आपण आपल्या देशाला शुभेच्छा देऊया, त्याचे अभिनंदन करूया, असं मोदींनी म्हटलं. तर मुंबईच्या अभिषेक जी यांनी नमोॲप वर एक संदेश पाठवला आहे. त्यांनी लिहिले आहे की 2020 ने आम्हाला जे काही दाखवले, जे शिकवले त्याचा कधी विचार देखील केला नव्हता. त्यांनी कोरोनाशी संबंधित सर्व गोष्टी लिहिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण #AatmaNirbharBharat ला पाठिंबा देत आहोत, पण आमच्या उत्पादकांनीही ते तयार करत असलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेशी तडजोड करू नये ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे. Zero effect, zero defect या कल्पनेसह काम करण्याची ही योग्य वेळ आहे.

भारतातील बिबट्यांची संख्या वाढली –
मोदींनी सांगितलं की, आता मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला अभिमान देखील वाटेल. 20141-18 दरम्यान भारतातील बिबट्यांची संख्या 60 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. 2014 मध्ये देशात बिबट्यांची संख्या सुमारे 7,900 होती, तर 2019 मध्ये ही संख्या वाढून 12,852 झाली. “देशातील बऱ्याच राज्यांत, विशेषत: मध्य भारतात, बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अव्वल स्थानी आहेत. ही एक मोठी कामगिरी आहे, असं मोदी म्हणाले.

2014 पासून सतत करत आहेत मन की बात –
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 72 वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात.