वटवृक्ष लावून साधली वृक्षारोपणाची तपपूर्ती

0
284

पिंपरी , दि.५ (पीसीबी) जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमेचे औचित्य साधून वटवृक्षाचे रोप लावून सोमवार, दिनांक ०५ जून २०२३ रोजी गोलांडे इस्टेट परिसर, चिंचवड येथे गोलांडे इस्टेट मित्रपरिवार आणि आनंद ज्येष्ठ नागरिक संघ यांनी सातत्याने बारा वर्षे करीत असलेल्या वृक्षारोपणाची तपपूर्ती साधली. पिंपरी – चिंचवड महापालिका नगररचना विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक प्रभाकर नाळे, गोलांडे इस्टेट मित्रपरिवारचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक – अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, अशोक नागणे, सरिता कुलकर्णी, स्मिता ब्रह्मे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रभाकर नाळे यांनी आपल्या मनोगतातून, “‘थिंक ग्लोबली ॲण्ड ॲक्ट लोकली’ या उक्तीप्रमाणे आपण पर्यावरणाबाबत आपले आचरण ठेवले पाहिजे. वृक्षारोपण, संवर्धन यासोबतच प्लास्टिक निर्मूलन या गोष्टी आपण वैयक्तिक पातळीपासून अंमलात आणल्या तर पर्यावरणाच्या ऱ्हासाला आळा बसेल!” असा विश्वास व्यक्त केला. गेल्या बारा वर्षांपासून परिसरातील वृक्षांची नित्यनेमाने निगा राखणारे ज्येष्ठ वृक्षप्रेमी सखाराम पाटील यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी राजाभाऊ गोलांडे यांनी, “वृक्षारोपण करणे सोपे आहे; परंतु नियमितपणे रोपांची काळजी घेऊन त्यांना सुरक्षितरीत्या वाढवण्यासाठी आईच्या काळजासारखे प्रेम करावे लागते!” अशी भावना व्यक्त केली.‌

ॲड. अविनाश गोलांडे, प्रवीण भोकरे, संपत पवार, रवींद्र कुलकर्णी, नरसिंह पाडुळकर, प्रभाकर काढे, शशिकांत पानट, दत्तात्रय पुजार यांनी संयोजनात सहकार्य केले. ज्ञानेश्वर खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र झेंडे यांनी आभार मानले.