लोणावळ्यामध्ये शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू

0
584

लोणावळा, दि. २ (पीसीबी) – अँबी व्हॅलीमध्ये शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.२) रात्री अकराच्या सुमारास समोर आली.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील अॅबी व्हॅलीजवळील विसाघर येथील सरपंच आणि पोलीस पाटील यांनी वन विभागाला शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास फोन करुन  माहिती दिली कि, गावाजवळ बिबट्याचा मोठा आवाज येत आहे. हा निरोप मिळताच वन विभागाच्या रेंज अधिकारी अंकिता तरडे व त्यांचे सहकारी पौड कार्यालयातून निघाले. रात्री साडेअकराच्या सुमारास ते घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत बिबट्याचा मृत्यू झाला होता. शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यातून सुटण्यासाठी केलेल्या धडपडीत तो जखमी झाला आणि यानंतर त्याचा मृत्यू झाला. वन विभागाचे अधिकारी ते जाळे कोणी लावले याचा शोध घेत आहेत. तर सध्या अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.