खासदार आढळराव-पाटील मराठा आरक्षणाबाबत जनतेची दिशाभूल करतायेत – दिलीप वळसे-पाटील

0
1558

पुणे, दि. २ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या विधेयकावर विधानसभेत झालेल्या चर्चेची चुकीची माहिती देऊन खासदार शिवाजीराव आढळराव– पाटील  जनतेची दिशाभूल करत आहेत, असे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीची सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असून  मराठा आरक्षणाला पहिल्यापासूनच पाठींबा दिला आहे , असे  वळसे पाटील म्हणाले.  

मराठा आरक्षणाच्या विधेयकावरील चर्चेदरम्यान आरक्षणासंदर्भातील मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात मांडावा , अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. परंतु  अहवाल न मांडता थेट आरक्षणाचे विधेयकच मांडण्यात आले. आरक्षण न्यायालयातही टिकण्यासाठी ते निर्दोष असावे, असे माझे मत होते. विधेयकामध्ये  कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत , त्याला आव्हान देता येणार नाही. तसेच न्यायालयात आरक्षणाला   धक्का लागणार नाही, हे तपासून  घेण्यासाठी मी आग्रही होतो , असे वळसे-पाटील म्हणाले.

आरक्षण खूप कष्टातून मिळाले आहे. आरक्षणावरील चर्चेच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मला सहभागी होता आले होते. अंतिम निर्णय जरी सरकारने घेतला असला तरी  राज्यामध्ये ५८ मोर्चे काढण्यात आले होते. तर ४२ जणांनी बलिदान दिले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर  ८ दिवस विरोधी पक्षांनी सभागृह बंद पाडले. त्यानंतर सरकारने निर्णय घेतला, असे सांगून आढळराव- पाटील चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.