लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील

0
1597

पंढरपूर, दि. ११ (पीसीबी) – आगामी  लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील. काही आमदार आमच्या संपर्कात असून त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (मंगळवार) येथे केला आहे.  

विखे पाटील यांनी आज पंढरपुरात  विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी  बोलत होते. यावेळी  राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांना राष्ट्रवादीत येण्याचे आवाहन केल्याबद्दल् विखेंना छेडले असता ते म्हणाले की, राष्ट्रवादीचेही काही आमदार आमच्या संपर्कात  आहेत, असे सांगून त्यांनी मुंडेंना प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे पंढरपुरातील एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांची जाहीर सभा आयोजित केली होती. या  सभेत मुंडे यांनी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याचे आवाहन केले होते.  त्याचबरोबर काँग्रेसचे काही आमदार देखील राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक  आहेत, असे मुंडे म्हणाले होते.  यावर विखेंनी मुंडे यांच्यावर पलटवार केला आहे.

धुळे आणि  अहमदनगर  महापालिकेतील  भाजपच्या विजयावर विखे म्हणाले की, या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने धनशक्तीबरोबरच पोलिसी बळाचा वापर केला. भाजपने अनेक गुंडांना राजाश्रय देऊन  सत्तेचा दुरुपयोग केला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेला हल्ला समाजाच्या आरक्षणासाठी  असलेल्या तीव्र  भावना असून या भ्याड हल्ल्याचे  समर्थन होता कामा नये. कायदेशीर मार्गाने लढा देणे गरजेचे आहे, असे विखे पाटील म्हणाले.