बांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची मागणी

0
2180

पिंपरी, दि. ११(पीसीबी) – महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील नोंदीत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू करावी. तसेच सुरक्षेसाठी सुरक्षासाधन संच देण्यात यावे, अशी मागणी बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी राज्याच्या कामागारमंत्र्यांकडे केली आहे.

जयंत शिंदे यांनी कामगारमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “राज्याच्या दुष्काळी भागातील बांधकाम कामगार पोटासाठी मिळेल त्या ठिकाणी कामासाठी स्थलांतर करत असतात. कामाची व्यवस्था झाली तरी त्यांची राहण्याची किंवा जेवणाची व्यवस्था होत नाही. त्यामुळे बरेच कामगार उपाशीपोटी किंवा अर्धपोटी अतिशय कष्टाची जड व अवघड कामे करत असतात. दिवसरात्र काम करणाऱ्या या कामगारांना किमान दुपारच्या वेळेस जेवणाची व्यवस्था करण्याबाबत बांधकाम कामगार सेनेने कामगार आयुक्तांकडे मागणी करत सक्षम पाठपुरावा केला होता. त्यामुळे कल्याणकारी मंडळाने मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्याची घोषणा केली. परंतु, त्याची अंमलबजावणी अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक शहरातील कामगार नाके, सर्व शासकीय व निमशासकीय बांधकाम प्रकल्पावरील कामगारांना दुपारी मध्यान्ह भोजन योजना लवकरात लवकर सुरू करावी. त्यामुळे कित्येक गरजू व भुकेल्या कामगारांच्या पोटाला आधार मिळेल. या कामासाठी शहरातील महिला बांधकाम कामगारांना प्राधान्य देण्यात यावे. त्यामुळे कामगारांच्या आर्थिक प्रगतीतही भर पडेल.

बांधकाम कामगारांना सुरक्षासाधने उपलब्ध असली तरच त्यांचे अनमोल जीव वाचतील. अन्यथा अपघात आणि अपघाती मृत्यू हे होतच राहतील. मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडे काम करत असताना त्यांना सुरक्षासाधने उपलब्ध होतात. परंतु छोट्या बांधकाम साईटवर काम करत असताना सुरक्षासाधने उपलब्ध होत नाहीत. कामगारांना धोकादायक स्थितीत काम करावे लागते. प्रत्येक कामगारांकडे स्वतःची साधने असणे गरजेचे आहे, आणि कामगार स्वतः पैसे खर्च करून हे सुरक्षासाधने विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे कल्याणकारी मंडळाने त्यांना या वस्तू दिल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.”