लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी काँग्रेसने घेतला रघुराम राजन यांचा सल्ला

0
535

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जाहीरनाम्यात रोजगारनिर्मिती हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. रोजगारनिर्मितीबरोबरच कृषी क्षेत्रावरही या जाहीरनाम्याचा भर असणार आहे. यासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचा सल्ला घेतला आहे.

या दोन मु्द्यांभोवतीच काँग्रेस पक्षाचा प्रचार फिरत राहणार आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अनेक भाषणांत बेरोजगारीचा मुद्दा प्रभावीरीत्या मांडला आहे. त्यासाठी या काळात त्यांनी दोनदा डॉ. राजन यांच्याशी चर्चा केली आहे. आपल्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यामध्ये राजन यांच्याशी राहुल गांधी यांनी अलिकडेच चर्चा केली होती.

डॉ. रघुराम राजन हे ऑगस्ट २०१२ ते सप्टेंबर २०१३ या काळात तत्कालीन यूपीए सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. सप्टेंबर २०१६मध्ये रिझर्व्ह बँक गव्हर्नरपदाची कारकीर्द संपल्यावर राजन अमेरिकेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.