आश्वासने देऊन ढुंकूनही न पाहणे हेच मोदीराज्य – शरद पवार

0
633

बारामती, दि. १८ (पीसीबी) –  बळीराजाशी बेईमानी करणाऱ्या भाजपला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आश्वासने द्यायची आणि नंतर त्याकडे ढुंकूनही पहायचे नाही हेच ‘मोदीराज्य’! अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर घणाघात केला. दहा टक्के आरक्षणात ग्रामीण विद्यार्थ्यांचा निभाव कसा लागणार? असा प्रश्नही शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला. बारामतीत आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यात पवार बोलत होते.

भाजपने सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने दिली. त्याबद्दल विचारले तर ते ‘चुनावी जुमले’ होते असे सांगण्यात आले. जनतेला आश्वासने द्यायची आणि सत्तेत आल्यावर त्याकडे ढुंकूनही पहायचे नाही हेच मोदीराज्य आहे. सध्याचे सरकार शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेत नाही. त्यांना या घटकांशी काहीही घेणंदेणं नाही. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत, मात्र सरकार त्याला मदत करत नाही. देशातल्या काळ्या आईशी इमान राखणाऱ्या बळीराजाशी या सत्ताधाऱ्यांनी इमान राखलेले नाही. त्यामुळेच आता यांना सत्तेत राहण्याचा अधिकार राहिला नाही, असे शरद पवार म्हणाले.

बारामतीत काल कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉम्रेड भालचंद्र कांगोही उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी भाजप सरकारच्या धोरणांवरही कडाडून टीका करत त्यांना सत्तेतून खाली खेचण्याचे आवाहन केले.