लुटमारीच्या घटनांना उधाण; एमआयडीसी भोसरी आणि पिंपरीत २ गुन्हे दाखल

0
244

पिंपरी, दि.०९ (पीसीबी) : एमआयडीसी भोसरी आणि पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीच्या दोन घटना घडल्या. याप्रकरणी सोमवारी (दि. 8) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही घटनांमध्ये दोन लाख 10 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. एका महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संगम राजभर (वय 20, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) आणि तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या दिराचा मुलगा घरासमोर पत्ते खेळत होता. त्यामुळे फिर्यादी यांच्या जावयाने त्याला पत्ते खेळण्यास मनाई केली. यावरून आरोपींनी फिर्यादी महिला, त्यांची मुलगी बेबी हिला हाताने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या गळ्यातील 50 हजारांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून शिवीगाळ करत आरोपी निघून गेले. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत तपास करीत आहेत.

चंदूराजा नथुराम आसवाणी (वय 53, रा. पिंपळे सौदागर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी रविवारी (दि. 7) रात्री पावणे अकरा वाजता साई चौक, पिंपरी येथे जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर गुळणा केला. याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता आरोपीने स्टीलचा ग्लास फिर्यादी यांना मारला. त्यानंतर आरोपीचे अन्य दोन ते तीन साथीदार तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांना पकडून त्यांच्या गळ्यातील एक लाख 60 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.