लग्न सभारंभात चोरी केलेले २६ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

0
150

बालेवाडी, दि.१० (पीसीबी) –बालेवाडी येथील ऑर्चिड हॉटेलमध्ये लग्न समारंभातून एका चोरटयाने लोकांची नजर चुकवून वधूच्या नातेवाईकांचे ६५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व ९ लाख रुपये रोख रक्कम चोरी केली. या प्रकरणातील आरोपींच्या घरातून हिंजवडी पोलिसांनी २६ लाखांचे दागिने जप्त केले आहेत.

६ डिसेंबर रोजी बालेवाडी येथील ऑर्चीड हॉटेलमध्ये एक लग्न समारंभ होता. त्या लग्न समारंभात अज्ञातांनी ६५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि नऊ लाख रुपये रोख रक्कम चोरून नेले. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना माहिती मिळाली की, अशाप्रकारे लग्न सभारंभात चोरी करणारे मध्यप्रदेश राजगढ़ जिल्हातील असू शकतात. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठांचे परवानगीने तपास पथकातील सहा पोलीस निरीक्षक राम गोमारे व त्यांचे पथक बोडा पोलीस ठाणे जि. राजगढ़ राज्य मध्यप्रदेश येथे जाऊन १७ दिवस वास्तव्य करून, आरोपी निष्पन्न केले. या तपासात चोरी करणारे इसम हे बोडा पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम कडीयासांसी, ता. पचोर, जि. राजगढ राज्य मध्यप्रदेश येथील रितीक महेश सिसोदिया (वय २० वर्षे), वरुण राजकुमार सिसोदिया (वय २३), शालु रगड़ो धपानी (वय २८), शाम लक्ष्मीनारायण सिसोदिया (वय ३८, सर्व रा. ग्राम कडीयासासी ता. पचोर ठाना बोडा जि. राजगढ़ राज्य मध्यप्रदेश) हे आहेत.

चोरी केलेल्या मालापैकी काही माल हा आरोपी यांचे घरी असल्याचे समजले असता हिंजवडी पोलिसांनी स्थानिक पोलीसांच्या मदतीने वरील चारही आरोपींचा शोध घेतला. परंतु ते राहते घरी मिळून आले नाहीत. त्यामुळे स्थानिक पोलीसांच्या मदतीने वरील आरोपींच्या नातेवाईकांकडे कौशल्याने तपास करून दाखल गुन्हयातील चोरी गेलेल्या सोन्याचे दागिन्यांपैकी २६ लाख रुपये किंमतीचे ५२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे जप्त केले आहेत. दाखल गुन्हयातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर विविध राज्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपींचा व उर्वरीत दागिन्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दहिफळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोन्याबापु देशमुख सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस अंमलदार, बाळकृष्ण शिंदे, बंडु मारणे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, अरुण नरके, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, सुभाष गुरव, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत यांनी केली.