मोशीत होणार 850 खाटांचे रुग्णालय; 450 कोटींचा खर्च

0
163

पिंपरी, दि.११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशीतील गायरान जमीनीवर 850 खाटांचे रूग्णालय उभारण्यात येणार असून यासाठी 214 कोटी रूपयांचा खर्च गृहित धरण्यात आला होता. आता हा खर्च तब्बल साडेचारशे कोटींवर गेला असून या खर्चाला महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बिनभोबाट मान्यता दिली आहे. मात्र, प्रस्तावित खर्च साडेचारशे कोटी गृहित धरण्यात आला असताना प्रत्यक्षात रूग्णालयाचे काम पूर्ण होईपर्यंत आणखी किती खर्च होईल, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

चिखली, मोशी, चऱ्होली या भागात जागा निश्‍चित करुन मोठे हॉस्पिटल उभारण्यासाठी जागेची निश्‍चित करावी. तसेच, यशवंतराव चव्हाण रुग्णालयावरील ताण कमी व्हावा. याकरिता समाविष्ट गावांमध्ये अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून उभारावे, असा संकल्प होता. त्यासाठी चिखली, मोशी, चऱ्होली या गावांतील जागा जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार मौजे मोशी, ता. हवेली येथील ग. नं. 646 पै. मधील आरक्षण क्रमांक 1/189 मध्ये 850 खाटांचे रूग्णालयाला जागा देण्यात आली.

मोशीत रूग्णालय उभारण्यासाठी 2022-23 च्या अंदाजपत्रकात 214 कोटी 74 लाख 83 हजार 647 रूपयांचा खर्च अपेक्षित धरून प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती. तशी 10 कोटींची तरतूदही करण्यात आली होती. मात्र, महापालिकेने रूग्णालय उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मे. बेरी. बिल्टस्पेस डिझाईन प्रा. लि. यांची नेमणूक करण्यात आली होती. या सल्लागाराने विस्तृत असे सर्वेक्षण करून रूग्णालयासाठी स्थापत्य, विद्युत, अग्निशामन, वैद्यकीय अशा कामाचे 2022-23 दरसुचीनुसार अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यानुसार रूग्णालयासाठी 214 कोटी 74 लाख 83 हजार 647 ही रक्कम अपुरी पडत असून साडेचारशे कोटी रूपयांची आवश्‍यकता असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार साडेचारशे कोटी रूपयांना आयुक्त सिंह यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच रूग्णालय बांधणे या नावात बदल करून रूग्णालय विकसित करण्यास मंजुरी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 1997 मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. चिखली, मोशी, चऱ्होली असा रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित होत आहे. तसेच, पुणे जिल्ह्यातील खेड, चाकण, जुन्नर, आंबेगाव या भागातून वायसीएम रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येतात. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्यस्थितीला 27 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून चालवले जाणारे वायसीएम हॉस्पिटलवर ताण येतो. पार्किंग आणि वाहतुकीचीही समस्या आहे. आता मोशीत उभारण्यात येणाऱ्या 850 बेडच्या हॉस्पिटलमुळे वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी होणार असून, समाविष्ट गावांसह महापालिका हद्दीलगतच्या ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा उपलब्ध होवून दिलासा मिळणार आहे.