रोहित शर्माचे शतक व्यर्थ; पहिल्या वनडेत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ३४ धावांनी पराभव  

0
690

सिडनी, दि. १२ (पीसीबी) – भारताचा सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज शतक झळकावून ही त्याला इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. सिडनी येथील सामन्यात भारताच्या फलंदाजांनी यजमानांच्या गोलंदाजी समोर नांगी टाकली. झाय रिचर्डसन आणि जेसन बेहरनडॉर्फच्या भेदक माऱ्यासमोर भारताची फलंदाजी  कोलमडली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८९ धावांचा पाठलाग करताना ५० षटकांमध्ये भारताला  ९ गड्यांच्या मोबदल्यात २५४ धावाच करता आल्या. अखेरीस ऑस्ट्रेलियाने ३४ धावांनी बाजी मारत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.  भारताचे शिखर, विराट आणि रायुडू हे झटपट बाद झाल्याने रोहित शर्माने धोनीच्या साथीने भारताचा डाव सावरला. रोहित शर्माने नेटाने ऑस्ट्रेलियन माऱ्याचा सामना करत १३३ धावांची शतकी खेळी केली.  मात्र धोनी वगळता एकाही फलंदाजाने त्याला  साथ दिली नाही.

धोनीने ९६ चेंडूत  ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. या संथ खेळीचा फटका पुढे भारताला बसला. अखेरच्या फळीत भुवनेश्वर कुमारने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सामना हातातून निसटला होता . ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसनने ४, बेहरनडॉर्फने २ बळी टिपले. तर पिटर सिडल आणि स्टॉयनिसने १-१ बळी घेत भारताची फलंदाजी मोडून काढली.