रा.स्व.संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम

0
420

पिंपरी, दि.२९ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या वतीने दीपावलीच्या शुभ पर्वावर शहरातील विविध भागात पाच ठिकाणी दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षीचा अपवाद वगळता दरवर्षी रा.स्व.संघातर्फे प्रकाशपर्वाच्या निमित्ताने स्नेह मिलन कार्यक्रमात वैचारिक मेजवानीचे आयोजन करण्यात येत असते यामध्ये प्रामुख्याने सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक यांसह कला ,विज्ञान तसेच विविध क्षेत्रातील नामवंत वक्ते, तज्ञांचा समावेश असतो. मागील वर्षी हे सर्व कार्यक्रम आभासी पद्धतीने संपन्न झाले होते, यावर्षी कोरोना विषयक सर्व नियमाचे पालन करून सदर कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

▪️देहू गट स्नेहमिलन
रविवार दि.३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता साई गार्डन, संभाजी नगर, चिखली येथे असून भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे सदस्य शिल्पश्री शाहीर गणेश टोकेकर आपल्या अभ्यासपूर्ण शैलीतून ‘खगोल शास्त्रीय दृष्टीने राष्ट्रीय घडामोडी’ या विषयावर विचार मांडणार आहेत.

▪️संत तुकाराम गट स्नेह मिलन रविवर दि.३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता पिंपळे गुरव येथील गारवे लाँन्स येथे होणार असून आळंदी येथील ह.भ.प. यशोधन महाराज साखरे आपल्या रसाळ वाणीतून ‘हिंदू संस्कृती आणि वैज्ञानिकता’ या महत्त्वपूर्ण विषयावर उद्बोधन करणार आहेत.

▪️ आकुर्डी गट स्नेहमीलन
गुरुवार दि.४ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ७.३० वाजता सोनाई मंगल कार्यालय, औंध – रावेत बी आर टी रस्ता, १६ नं.बस स्टॉप जवळ वाकड येथे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ विचारवंत, रा.स्व. संघाचे अ.भा.कार्यकारिणी सदस्य अनिरुद्धजी देशपांडे ‘शैक्षणिक पद्धती’ या विषयावर मंथन करणार आहेत.

▪️चिंचवड गट स्नेहमीलन
शुक्रवार दि.५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता बालाजी लाँन्स, विजयनगर, काळेवाडी – पिंपरी पुलाजवळ काळेवाडी येथे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रबोधिनीचे सह संचालक केदार तापीकर ‘भारत महासत्ता होताना..’ याविषयावर विवेचन करणार आहेत या कार्यक्रमाला पी.के. इंटरनॅशनल शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

▪️ भोसरी गट स्नेहमीलन
बुधवार दि.३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता वेदश्री तपोवन, मोशी येथे करण्यात आले असून पश्चिम महाराष्ट्र प्रांत समरसता गतिविधी संयोजक मकरंद ढवळे ‘भारतीय संस्कृती’ या विषयावर मौलिक विचार मांडणार आहेत.

सेवा कार्यासाठी कायम तत्पर असलेल्या संघ स्वयंसेवकांकडून सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या जनजाती कल्याण आश्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता फराळाचे देखील संकलन करण्यात येणार आहे. कोरोना विषयक नियमाचे पालन करून दीपावलीच्या तेजोमय पर्वात सहकुटुंब या वैचारिक मेजवानीचा लाभ घेण्याचे आवाहन रा.स्व संघाचे जिल्हा संघचालक विनोद सूरजभान बन्सल यांनी केले आहे.▪️