दिवाळीला गावी जाण्याचे ठरवताय…! जरा थांबा 

0
212

– शहरातील बंद घरांवर आहे चोरट्यांचा डोळा

पिंपरी : दि. २९ (पीसीबी) – दिवाळी सणाला जर तुम्ही सहकुटुंब गावी जाण्याचा प्लॅन करीत असाल.. तर जरा थांबा… आधी हे वाचा… मागील वर्षी सण साजरा करण्यासाठी गावी गेलेल्या २६ जणांची घरे फोडून चोरटयांनी सुमारे १९ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. त्यामुळे यंदा गावाकडं जाताना तुम्हाला अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मागील नऊ महिन्यात शहर परिसरात एक हजार ५७९ ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये ६६३ ने वाढ झाली आहे. यामध्ये वाहन चोरीचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच एक हजार ३४ इतके आहे. याव्यतिरिक्त २४९ घरफोड्यांची नोंद आत्तापर्यंत झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये ६२ ने वाढ झाली आहे. यातील विशेष बाब म्हणजे २८ घरे भरदिवसा फोडली आहेत. त्यामुळे अलीकडे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे बोलले जात आहे.

चोरट्यांचा हा धुडगूस सुरु असताना दिवाळी काही दिवसांवर आली आहे. काही वर्षांपासून दिवाळी चोरट्यांसाठी एक संधी ठरत आहे. दिवाळी सणासाठी अनेकजण सुट्ट्या घेऊन मूळगावी जाणे पसंत करतात. प्रवासात मौल्यवान वस्तू , दागिने गहाळ किंवा चोरीला जाण्याच्या होण्याच्या भीतीने त्या घरातच लॉकरमध्ये ठेवल्या जातात. मात्र, दिवाळीत बंद घरे फोडून चोरटे ऐवज लंपास करीत असल्याचे गतवर्षीच्या घटनांवरून समोर आले आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या नागरिकांनी शहरातील घरांच्या सुरक्षितते बाबत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

काय खबरदारी घ्याल- गावी जात असाल तर घरात सोने, रोकड ठेवू नका. घराला उत्तम दर्जाचे दरवाजे, सुरक्षा यंत्रणा बसवावी.  दागिने, रोकड बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवावी. संशयित हालचाली दिसल्या तर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती द्या. रात्रीच्या वेळी घरातील आणि बाहेरील लाइट चालू राहतील याची व्यवस्था करावी. घरात आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत. सीसीटीव्ही कॅमऱ्याचे डीव्हीआर सुरक्षित राहील याची काळजी घ्या.

‘स्टेटस’ पडेल महागात   
अलीकडे बहुतांश मंडळी गावाला गेल्यानंतर व्हाट्स अप स्टेटस किंवा फेसबुकवर स्टोरी क्रिएट करतात. आपण कोठे आणि कोणासोबत आहोत, याची माहिती जाहीर करून आपल्या घरात कोणी नाही, हे दाखवून देतात. त्यामुळे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सर्वांनाच त्यांच्या घरात कोणी नसल्याचे समजते. चोरी करण्याच्या उद्देशाने सोशल मीडिया हाताळणाऱ्या चोरट्याने हे स्टेट्स, स्टोरी म्हणजे आयती संधी असते. यापूर्वी फेसबुकवरील फोटो, व्हाट्स अप स्टेटस पाहून चोरटयांनी घरे फोडल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. 

सामान्य नागरिका प्रमाणेच पोलिसांना देखील मूळगावी कटुंबासोबत दिवाळी साजरा करण्याची इच्छा होते. त्यासाठी ते धडपड करून सुट्ट्या मंजूर करून घेतात. प्रभारी अधिकारी देखील जास्त जास्त कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सुट्ट्या देण्याचा प्रयत्न करतात. त्याचा परिणाम गस्तीवर होऊन चोरट्यांचे फावते. त्यामुळे दिवाळीतील सुट्ट्यांबाबत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

मागील वर्षी दिवाळी सणासाठी गावी गेलेल्या नागरिकांची बंद घरे चोरटयांनी फोडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी गावी जाताना मौल्यवान वस्तू घरात ठेऊ नयेत. तसेच, शक्य असेल तर एखादा सदस्य घरी ठेवावा. यावर्षी चोऱ्या होऊ नये यासाठी गस्तीवरील कर्मचारी वाढवण्यात येणार आहेत. मात्र, तरी देखील नागरिकांनी स्वतः खबरदारी घेणे आवश्यक आहे.