राष्ट्रवादी अध्यक्षपदाचे ठरले

0
274

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय काल कार्यक्रमात घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्यानंतर मी माझ्या निर्णयावर विचार करेन असं शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी आज यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे.राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं ते म्हणाले आहेत. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमण्यात आली आहे त्यांनी 5 मेला बैठक घ्यावी, त्या बैठकीत जो काही निर्णय घेण्यात येईल तो आपल्याला मान्य असेल असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.

तर पुढे पवार म्हणाले की, ‘मी पक्षातील वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं असं मला आता वाटतं आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकपणे सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला. पण आपण 6 मे रोजीची बैठक 5 मेलाच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असंही ते पुढे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक ही 6 मे रोजी होणार होती. पण आता शरद पवारांनी सांगितल्यानुसार ही बैठक 5 मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार आपला निर्णय मागे घेणार का? किंवा राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार याचं उत्तर 5 मे ला मिळणार.