राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर ?

0
1591

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यातील वाद  पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. नाराज असलेले अनिल तटकरे यांनी मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत सुनिल तटकरे यांचे पुत्र राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे हेही उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.  

सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. आदिती  यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे अवधूत यांनीही स्वतःची तयारी सुरु केल्याचे सांगितले जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये अवधूत शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची   शक्यता आहे. त्यामुळे  त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान,  तटकरे कुटुंबाशी संबंधित सूत्रांनी या भेटीसंबंधी कोहीही बोलण्यास नकार दिला आहे. तर शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांनी या भेटीला दुजोरा दिला आहे. अवधूत व अनिल तटकरे यांनी तयारी दाखवल्यास दसरा मेळाव्यात त्यांच्या प्रवेशाची घोषणा  होऊ शकते.