रावसाहेब दानवेंचा दीड लाखांनी पराभव झाला नाही, तर मी राजकारणातून संन्यास घेईन – संजय काकडे  

0
2439

पुणे, दि. १९ (पीसीबी) –  शिवसेना- भाजप यांची आगामी लोकसभा निवडणुकीत  युती न झाल्यास भाजपला मोठा फटका बसेल. ४८ पैकी ४० मतदारसंघ तर सोडाच, पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघातही विजय मिळवता  येणार नाही. दानवे यांचा दीड-दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला नाही,  तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे विधान भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केले आहे.

काकडे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.  दानवे यांनी शिवसेना सोबत आली नाही, तरी आम्ही ४० जागांवर विजयी होऊ, असा दावा केला होता. मात्र,  काकडे यांनी दानवेंचा हा दावा  फेटाळून लावताना शिवसेना सोबत न आल्यास  दानवे यांना स्वत:चा मतदारसंघ राखता येणार नाही, असा प्रतिदावा काकडे यांनी केला. यावेळी काकडे यांनी पुण्यातील भाजप नेत्यांविषयी नाराजीही व्यक्त केली.  त्याचबरोबर  माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत, असेही  काकडे म्हणाले.

काकडे म्हणाले की, मी सर्व्हे केला असून भाजप –शिवसेना युती न झाल्यास भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागेल. भाजपच्या जागांमध्ये मोठी घट होईल. तसेच दानवे यांना आपला मतदारसंघातील पराभवही रोखता येणार नाही. त्यांचा दीड ते दोन लाखांनी पराभव होईल, असे भाकीत काकडे यांनी केले आहे. दरम्यान, काकडे यांच्या या विधानावर भाजपकडून अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.