मुख्यमंत्र्यांनी गिरीष बापटांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी –धनंजय मुंडे

0
546

बीड, दि. १९ (पीसीबी) – बिभिषण माने या दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला पदाचा गैरवापर करून बेकायदेशीररीत्या परवाना देण्यात आला आहे. या प्रकरणी पदाचा गैरवापर केल्याबद्द्ल अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील मुरंबी (अंबाजोगाई) येथील स्वस्त धान्य दुकानाच्या परवानाप्रकरणी  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. मंत्री हे जनतेचे विश्वस्त आणि रक्षक असतात, बापट यांनी कर्तव्यात कसूर केली आहे. त्याचबरोबर पदाचा गैरवापर केला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

यावर मुंडे यांनी बापट यांच्यावर निशाणा साधला आहे. बापट यांच्यावर उच्च न्यायालयाने यापूर्वीही अनेक प्रकरणात वारंवार ठपका ठेवला आहे. त्यामुळे त्यांना एक मिनिटही पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे.