बारामतीत या तुम्हाला दाखवतोच; अजितदादांचे गिरीश महाजनांना खुले आव्हान

0
895

जळगाव, दि. १९ (पीसीबी) – पवारांची बारामती जिंकून दाखवतो, असे वक्तव्य करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना राष्ट्रवादीचे नेते व आमदार अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्यात येऊन महाजन यांना आव्हान दिले आहे. बारामती काय आहे माहित आहे का? बारामतीत या तुम्हाला दाखवतोच, असे खुले आव्हान अजितदादांनी गिरीश महाजनांना दिले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळवून देण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. महाजन यांनी इलेक्शन मॅनेजमेंट गुरू अशी ओळख निर्माण झाली आहे. अनेक निवडणुका जिंकल्याने आत्मविश्वास आलेल्या महाजन यांनी मला पक्षाने परवानगी दिली, तर पवारांची बारामती देखील जिंकून दाखवतो, असे वक्तव्य नुकतेच केले आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार अजितदादा पवार हे शुक्रवारी परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने पारोळा येथे झालेल्या जाहीर सभेत महाजन यांना बारामतीत येण्याचे खुले आव्हान दिले आहे. बारामती काय आहे माहित आहे का? बारामतीत या तुम्हाला दाखवतोच असे म्हणत अजितदादांनी महाजन यांना आव्हान दिले आहे. बारामतीच्या लोकांचे आमच्यावर खूप प्रेम आहे. बारामतीकर गेली ५० वर्ष आम्हाला निवडून देत असल्याचे त्यांनी सांगितले.