राफेल प्रकरणाचे समर्थन केलेले नाही; शरद पवारांचा खुलासा

0
546

बीड, दि. १ (पीसीबी) – राफेल लढाऊ विमानाच्या खरेदी व्यवहाराची माहिती गुप्त का ठेवण्यात आली आहे? असा सवाल करून राफेल प्रकरणाचे मी सर्मथन केलेले नाही,असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. सरकार जर या प्रकरणी खुलासा करणारच नसेल, तर आरोप होणारच त्यामुळेच राफेल खरेदीची माहिती संसदेत देण्यात यावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचा आज (सोमवार) संकल्प मेळावा बीडमध्ये झाला. यावेळी शरद पवार म्हणाले की, राफेल प्रकरणी सरकारवर विरोधकांकडून आरोप होत आहेत, या आरोपांवर सरकार खुलासा देणार नसेल, तर आरोप होणारच. त्यामुळे राफेल विमाने खरेदी व्यवहाराची माहिती संसदेत देण्यात यावी.

राज्यात दुष्काळाचे संकट ओढवले आहे. शिवार कोरडी पडली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव नाही. तुमच्या हातात सत्ता आहे, केवळ कायद्याची भाषा करु नका. हमीभावाचा कायदा करायला तुम्हाला कोणी अडवलय का? असा सवालही पवारांनी यावेळी केला. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर पवारांनी भाजप सरकावर टीकेची झोड उठवली.