राणा दांम्पत्याला कोठडितलेच जेवण ,प्रतिज्ञापत्रात पोलिसांचा अत्यंत गंभीर आक्षेप

0
337

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावर हनुमान चालिसा पठण करण्याच्या मोहिमेमुळे चर्चेत आलेलं राणा दाम्पत्य सध्या तुरुंगात आहे. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल या प्रकरणाची सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता त्यांना सत्र न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपल्याला तुरुंगात घरचं जेवण मिळावं यासाठीचा अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. राणा दाम्पत्याने गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे.

या दोघांविरोधात १२४ अ कलमांतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही जामीन मिळाल्यास बाहेर पडल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद काल सुनावणीदरम्यान करण्यात आला. अखेर न्यायालयाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती, ती आज होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा स्तोत्राचे पठण करायचे होते, असा भोळेपणाचा आव आणत राणा दांपत्याने जामिनासाठी अर्ज केला असला तरी हा प्रकार तितका साधासरळ नाही. त्यामागे महाविकास आघाडीच्या अस्तित्वालाच आव्हान देण्याचा मोठा दाव होता, असा खळबळजनक दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. सत्तेपासून वंचित असलेला भाजप आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचे विरोधक हे जाणीवपूर्वक सरकारविरोधी वातावरण तयार करून आघाडी सरकार उलथवून लावण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोप देखील मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राणा दांपत्याच्या जामिन अर्जावर होणाऱ्या आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.