राज ठाकरे चंद्रकांत पाटलांचे आव्हान स्वीकारणार का?

0
2529

कोल्हापूर, दि. १० (पीसीबी) –  राज्यातील रस्त्यावरील  खड्ड्यावरून भाजप सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात येत असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही  कार्टुनच्या माध्यमातून सरकारवर  टीका  केली  आहे. या टीकेला उत्तर देताना राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांना आपल्यासोबत राज्याचा दौरा करण्याचे आव्हान दिले आहे.  

कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले की, राज ठाकरे मोठे नेते आहेत. मी कॉलेजपासून त्यांचे कार्टुन पाहत आलो आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा माझ्या सोबत काही ठिकाणी दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी आम्ही केलेले काम पाहिले आहे. त्यांनी जाहीर सभेत  भाजपच्या कामाचे कौतुक  केले आहे, असे पाटील यांनी सांगितले.

काही ठिकाणी सर्वच कामे पूर्ण होण्यास मर्यादा येत आहेत. त्यांनीही समजून घेतले आहे. आता राज ठाकरेंनीही माझ्या सोबत फिरून पाहणी करावी. त्यांनाही आम्ही केलेली कामे दाखवू, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंनाच आव्हानच दिले. आता राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या आव्हान स्विकारणार का ?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.