सुधीर मुनगंटीवारांचा शिकार करणाऱ्या माफियांच्या टोळीशी संबंध – संजय निरूपम  

0
440

मुंबई, दि. १० (पीसीबी) – अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले  आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्राण्यांच्या हत्येसाठी ओळखले जातात. ते शिकार करणाऱ्या माफियांच्या टोळीत सामील असावेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आज (शनिवार) येथे केला आहे.

अवनी वाघिणीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर निरुपम यांनी पत्रकार परिषदेत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला चढवला. राज्यात भाजपचे सरकार येताच २०१५ मध्ये चौदा वाघांचा मृत्यू झाला. तर २०१६ मध्ये १६ आणि २०१७ मध्ये तब्बल २१ वाघांचा मृत्यू झाला आहे. यात काही वाघांचा नैसर्गिक मृत्यूही झाला असावा.

मात्र, वाघांना ठार मारल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावरून मुनगंटीवार हे शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांच्या टोळीत सामील असावेत, असे त्यांनी म्हटले आहे. जय वाघ अजूनही बेपत्ता आहे. ही साधी गोष्ट नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.