राज ठाकरेंवर टीका करणाऱ्याला मारणारच, अनुभवायचे असेल तर बोलून बघा; मनसेचे भाजपला आव्हान

0
1077

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – ‘लाव रे तो व्हिडीओ’ आणि  ‘आता बघाच तो व्हिडीओ’ या भाजप आणि मनसेतील व्हिडीओ वॉरनंतर आता दोन पक्षात आव्हान प्रतिआव्हान देण्यास सुरूवात झाली आहे.    राज ठाकरेंबाबत जर कोणी खालच्या पातळीवर बोलले, तर आम्ही त्याला मारणारच. तुम्हाला अनुभवायचे असेल तर बोलून बघा, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी  म्हटले आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी रंगशारदामध्ये आज (शनिवार) सभा घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत त्यांची  खिल्ली उडवली होती.  यावर  प्रत्युत्तर देण्यासाठी संदीप देशपांडे यांनी  आज पत्रकार परिषद घेत भाजपचा खरपूस समाचार घेतला.

देशपांडे म्हणाले की, आशिष शेलारांना सभा घ्यायची होती, तर एकदा कृष्णकुंजवर येऊन राज ठाकरेंकडून त्यांनी धडे घ्यायचे होते,  अशा शब्दात देशपांडे यांनी शेलारांवर निशाणा साधला. राज ठाकरेंच्या राज्यभरातील प्रचारसभांमुळे भाजपची पोलखोल झाली आहे. यामुळे भाजपच्या पायाखालाची वाळू सरकली आहे. भाजप घाबरला आहे. म्हणूनच शेलार यांनी सभा घेऊन उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, असा टोला देशपांडे यांनी लगावला.