राज ठाकरेंना गांभीर्याने घेऊ नका – मुख्यमंत्री फडणवीस

0
2204

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – पाच राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करताना  पप्पू आता परमपूज्य झाला, असे म्हटले होते. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र त्यांची राजकीय वक्तव्ये आणि व्यंगचित्रे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्या विधानावर उत्तर दिले आहे.  इतके दिवस भाजपचे नेते राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवत होते. मात्र राहुल गांधी आता परमपूज्य झाले आहेत, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. त्यावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना गांभीर्याने घेऊ नका. ते केवळ आपली मते मांडतात, त्यांच्याकडे बाकी काही काम नाही. त्यामुळे त्यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नका, असेही फडणवीस  म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना खूप गांभीर्याने घेऊ नका असे म्हणत त्यांच्या टीकेतील हवाच काढून टाकली.  आपल्याला ठाऊकच आहे की राज ठाकरे सरकारविरोधात भूमिका घेत असतात. व्यंगचित्रातूनही व्यक्त होत असतात. राज ठाकरे जे काही बोलतात ते त्यांचे मत असते, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.