राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर ?

0
600

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी (दि.१४) होणार होता. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. त्यामुळे  मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक आमदारांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. तर विधानसभा निवडणुकांना अवघे तीन महिने शिल्लक असताना  पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार?, असा प्रश्नही उपस्थित केला जात   आहे.

राज्यातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. त्यामुळे कोणकोणत्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. या मंत्रिमंडळ विस्तारातील वाट्यावरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. यावरून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलासंदर्भात शहा यांच्याशी  चर्चा केली. यानंतर शिवसेना आणि मित्र पक्षांनाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे भाजपच्या नेत्यांनी म्हटले होते.