अमेरिकेचे परराष्ट्रमंत्र्यालाही वाटतं, ‘मोदी है तो मुमकीन है’

0
498

न्यूयॉर्क, दि. १३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान भाजपाकडून ‘मोदी है तो मुमकीन है’ची घोषणा देण्यात आली होती. आता याच घोषणेचा पुनरुच्चार अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनीही केला आहे. ‘इंडिया आयडियाज समिट’ या कार्यक्रमात बोलताना पोम्पिओ यांनी हे विधान केले.

भारतासोबत अमेरिकेचे संबंध कायमच पुढे जाणारे असावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी ‘मोदी है तो मुमकीन है’ या घोषणेची पुनरावृत्ती केली. दोन्ही देशांमधील संबंधांमध्येही असेच होऊ शकते असे त्यांना सुचवायचे होते. पोम्पिओ म्हणाले, भारत-अमेरिका यांच्यातील संबंध अधिक मजबूत होण्यासाठी राजकीय आघाडीवर आम्ही काम करु इच्छितो त्यामुळे दोन्ही देशांना याचा फायदा होईल. मोदी आणि ट्रम्प सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही भविष्यासाठीच्या संधी पाहतो आहोत.

जगातल्या सर्वांधिक लोकसंख्या असलेल्या लोकशाहीने सर्वात जुन्या लोकशाहीसोबत मिळून भविष्यासाठी काम करायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करताना दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य, आर्थिक खुलेपणा, उदारीकरण आणि सार्वभौमत्व याबरोबरच द्वीपक्षीय संबंधांना मजबूती द्यायला हवी, भारत आणि अमेरिकेकडे परस्परांमधील संबंध सुधारण्याची सुवर्णसंधी आहे, असेही पोम्पिओ यांनी म्हटले आहे.