राज्यातील २६ जिल्ह्यांतील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

0
882

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला दिलासादायक बातमी आहे. राज्यातील २६ जिल्ह्यांतील१५१ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने आज (बुधवार) दुष्काळ जाहीर केला आहे. ११२ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर ३९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन परिशिष्ट ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या १५१ तालुक्यांमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे गंभीर/मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्याने या आदेशाची आजपासून (दि.३१ ऑक्टोबर) अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील. दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.