“राजा विकणं बंद कर. भाजपापेक्षा काँग्रेस बरे होत”; शिवसेनेचा भाजपला टोला

0
188

रत्नागिरी, दि.०९ (पीसीबी) : शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. महागाई आणि नोटबंदीच्या मुद्यावरून त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली. ते खेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. गेल्या 70 वर्षांमध्ये काँग्रेसने काही केले आहे का? असे मोदींनी 2014 साली विचारले होते. तेव्हा लोकही म्हणाले होते काहीच केले नाही, आणि जनतेने मोदींना पंतप्रधान केले. मात्र देशाची सत्ता हाती येताच मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने देशातील एक-एक गोष्ट हळूहळू विकायला सुरुवात केली आहे. लोकांनी त्यांना निवडून दिले आणि त्यांनी देश विकायला कढला. आता लोकही त्यांना म्हणतात राजा विकणं बंद कर. भाजपापेक्षा काँग्रेस बरे होते अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाल्याचे जाधव म्हणाले.

भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींचा आवाज काढत त्यांची मिमिक्री देखील केली. यावेळी उपस्थितांना हसू अनावर झाले. महागाईच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी भाजपावर टीका केली. 2014 साली महागाईवर भाजपाने रान उठवले होते. ते आपले मुद्दे आक्रमकपणे मांडत होते. याच मुद्द्यावरून त्यांची सत्ता आली, मात्र आता सध्याची परिस्थिती काय आहे? महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. लोकांना गॅस घेणे परवडत नाही. मोदींनी उज्वला योजना आणली लोकांना वाटले फूकट मिळाले आहे, त्यामुळे अनेकांनी गॅस कनेक्शन घेतले. मात्र आता सरकारने सबसीडी बंद केल्याने पुन्हा एकदा लोकांवर चूली पेटवण्याची वेळ आल्याचा टोला जाधव यांनी लगावला आहे.

नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी अचानक नोटबंदीचा निर्णय घेतला. नोटबंदीमुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. सर्व कामधंदे सोडून बँकेत रागा लावाव्या लागल्या, या निर्णयाचा रोजगारावर देखील परिणाम झाला. मात्र प्रत्यक्षात हाती काहीच लागले नसल्याचेही जाधव म्हणाले.