राजश्री शाहू उद्यानाच्या पुनर्विकासात ८० टक्के भ्रष्टाचार, चौकशिची मागणी

0
144
  • १ कोटी ६६ लाखांच्या कामात १ कोटी २० लाख खाल्ले

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – चिंचवड शाहुनगरमधील राजश्री शाहू उद्यानातील पुनर्विकासाच्या १ कोटी ६६ लाखाच्या कामात तब्बल ८० टक्के म्हणजेच १ कोटी २० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. चौकशी करून सर्व दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, अशा प्रकारे शेकडो कोटींची कामे याच ठेकेदाराकडे असल्याने प्रचंड मोठा भ्रष्टाचार उघडकिस येण्याची दाट शक्यता आहे, असेही भापकर यांनी म्हटले आहे.

या पत्रकार परिषदेला मानव कांबळे, ब्रह्मानंद जाधव, सचिन पवार, सुरेश भिसे, दिलीप काकडे उपस्थित होते. भापकर म्हणाले की, शाहुनगर मधील राजर्षी शाहू उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम झाले आहे. ए.आर. हार्दिक के पांचाळ याने खोटी कागदपत्रे सादर केली असताना आर्किटेक्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली.

पांचाळ यांनी धूर्तपणे उद्यानाच्या पुनर्विकासाच्या निविदेत विशेष अटी समाविष्ट करून निविदा तयार केल्या होत्या. या निविदेत त्याच्या भावाच्या कंपनीने अट पूर्ण केली नसतानाही निविदा मूल्यापेक्षा ४% कमी दराने मंजुर केली. निविदेमध्ये पुनर्विकासाच्या कामाचा एक भाग म्हणून समाविष्ट केलेल्या २१ बाबींचा समावेश होता. अनेकांचा काम करताना वापर केला नाही. कमी दर्जाचे साहित्य वापरले.

शाहूनगर मधील राजश्री शाहू उद्यानाच्या पुनर्विकासाच्या या १ कोटी ६६ लाखाच्या निविदेमध्ये ए.आर. हार्दिक के पांचाळ यांनी फेरफार करून महापालिकेची १ कोटी २० लाखांची फसवणूक केली आहे. यामध्ये सल्लागार, ठेकेदार, अधिकारी, पदाधिकारी यांनी संगनमताने करदात्या नागरिकांच्या पैशाची लुट केली आहे. त्यामुळे आपण स्वतः हा लक्ष घालून तातडीने शाहुनगर येथील उद्यानात दौरा करून या प्रकरणाची चौकशी करावी.

विभागातील पाच नागरिक व तक्रारदार म्हणून आम्ही व मनपाच्या वतीने व्हिडिओ रेकॉर्डिंग करावी. त्यानंतर तातडीने सर्व दोषींवर फौजदारी कारवाई करावी. गैरव्यहार केलेल्या सर्व स्थापत्य, उद्यान, विद्युत, लेखापरीक्षक व निविदा प्रक्रियेतील सर्व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. या झालेल्या अपहरणाच्या रक्कमा संबंधितांकडून कायद्याप्रमाणे चारपट वसूल कराव्यात, अशी मागणी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

याबाबत पत्रकारांना माहिती देताना सह शहर अभियंता मनोज सेठिया म्हणाले की, उद्यानाचे काम चार वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. पैसे अदा केले आहेत. याबाबतची माहिती घेण्यात येईल. आयुक्त जे निर्देश देतील, त्यानुसार कारवाई केली जाईल.