राजकोट कसोटी भारताने डावाने जिंकली; वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत १-० आघाडी

0
408

राजकोट, दि. ६ (पीसीबी) – वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने राजकोट कसोटीत विंडीज संघावर डावाने विजय मिळवत मालिकेत सलामी दिली आहे. भारताने १ डाव आणि २७२ धावांनी सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ १९६ धावांमध्ये गुंडाळला. भारताकडून दुसऱ्या डावात कुलदीप यादवने ५, रविंद्र जाडेजाने ३ तर रविचंद्रन आश्विन २ विकेट घेतल्या. दुसरी कसोटी  १२ ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे सुरु होणार आहे.

पहिला डाव १८१ धावांमध्ये आटोपल्यानंतर फॉलोऑन घेऊन मैदानात उतरलेल्या विंडिजच्या संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी सावध खेळ केला. मात्र रविचंद्रन आश्विनने क्रेग ब्रेथवेटला तंबुत धाडत विंडिजला पहिला धक्का दिला. तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंत विंडिजने एका गड्याच्या मोबदल्यात ३३ धावा कशाबश्या केल्या. मात्र, उपहारानंतर विंडिजचा डाव पुन्हा एकदा कोसळला.

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर विंडिजच्या फलंदाजांनी नांगी टाकली. कायरन पॉवेल आणि शाई होप यांच्यात झालेली ४७ धावांची भागीदारी आणि मधल्या फळीत रोस्टन चेसने पॉवेलला दिलेली साथ या जोरावर वेस्ट इंडिजचे १५० धावांचा टप्पा ओलांडता आला. पॉवेलने भारतीय फिरकीपटूंवर चांगला हल्लाबोल करत अर्धशतक झळकावले. मात्र, त्यानंतर विंडीजच्या उरलेल्या सर्व फलंदाजांनी गाशा गुंडाळला.